माझं आजोळ- इंगळवाडी ( नाणारच्या आठवणी)

सुमन दत्तात्रय पानवलकर

नाणार म्हणजेच इंगळवाडी माझं आजोळ. आजोळी फक्त सोवळी आजी आणि विधवा मावशी. बिचारी ताईमावशी. सातव्या वर्षी लग्न झालं आणि आठव्या वर्षी तिला वैधव्य आलं. वयात येण्यापूर्वीच वैधव्य आलं त्यामुळं सासरी जायचा योगच आला नाही. माहेरीच मुक्काम. तीन मामा आपापल्या संसारात मुंबईत रमलेले. मे महिन्यात तीनही मामा आपल्या कुटंबासह गावी इंगळवाडीला येत आणि ताईमावशी आपलं दु:खं विसरुन त्यांचा छान पाहुणचार करी. उन्हाळा आला की आम्हालाही आजीकडे जायचे वेध लागायचे. आजीलाही नातवंडांची तेवढीच ओढ. त्याकाळात आमच्या गावातून म्हणजे खारेपाटणामधुन खाऊच्या पानांचे करंडे आजीच्या गावी जात. असे पानांचे दोन व्यापारी एक खांडेकर दुसरे मणचेकर. ते दर आठवड्याला खारेपाटणला येत. आजीचा मग त्यांच्यामागे तगादा सुरु होई लेकरांना कधी घेऊन येताय?’ त्यांची होडी असे. कधी कधी त्यांचे येणे व्हायचे ते आमच्या वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर असताना. मग हे दोघे पानवाले निघून जातील या भीतीने आम्ही पेपर अर्धाच टाकून घरी येत असू. पानवाले रात्रीच्या होडीने जायचे असले तरी आमची दिवसभर उगाचच घाई चालू असे. बालवयात तोच एकमेव बदल. सुटीचा आनंद, आजीची माया, मनसोक्त हुंदडणे या सगळ्यातून आमची ही घालमेल सुरु असायची.

      सायंकाळी खांडेकर-मणचेकर रसदार वांग्याची भाजी आणि भात शिजवून यथेच्छ जेवत. त्यांना आमचा स्वयंपाक कसा आवडावा? मग सर्वजण होडीत. आईनं होडीत खायला आंबोळ्या, नारळाची चटणी, बटाट्याची भाजी भरपूर दिलेली असे. आंबोळ्या खा आणि नदीच्या पाण्यात हात धुवाहे सांगायला आई विसरायची नाही. आमच्या गावी पिठाची गिरण तर आजीकडे जाते दळायला ताईमावशी. मग आमच्याबरोबर ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ दिले जायचे. खारेपाटण-इंगळवाडी अंतर 30-35 कि.मी. पाण्यातून तेवढ्या प्रवासाला रात्र लागे. होडीतच डुलक्या घ्यायचे. भल्या पहाटे होडीकर वाघोटण्याचा धक्का आला की हाकारायचे, ‘बाळकृष्ण सीताराम ठाकूर हाजीहाजी म्हणजे हजर व्हा. हा हाकारा ऐकल्यावर ताईमावशी चूड पेटवून झाडीतून आम्हाला न्यायला यायची. ही चूड म्हणजे ताग  कापल्यावर मधला गाभा वाळवून त्याची बांधून ठेवलेली मोळी त्यातून काढलेली असे. ही चूड घेऊन येणा-या मावशीला पाहून आम्ही म्हणणार, ‘भूत आलंएखादे भावंड म्हणे, ‘भूत गोरेपान आहे हं’. ताईमावशी खरोखरी लावण्यवती पण बालवयातल्या वैधव्याने तिच्या सौंदर्याची राख झाली.

      होडीतून उतरलेल्या आम्हा भाचरांना ताईमावशी शिवायची नाही. का? तर नदीतल्या माशांचे पाणी आमच्या अंगावर उडालेले म्हणून. आम्हा लहान मुलांना होडीकर धरुन उतरवत, सामान पोचते करीत. धान्यं, पीठे मात्र चालत. वाट मावशीच्या पायाखालची. तिच्याबरोबर घरी पोचल्यावर पितळी कपबशीतून चहा आणि घोंगड्यावर एखादी डुलकी. उजेडल्यावर पुन्हा चहा आणि विहीरीवर रवानगी. प्रत्येकाच्या डोक्यावर चार चार तांबे पाणी मावशी घालणार. ओवळ्याचे सोवळे झाल्यावर डोणीतले पाणी मनसोक्त घ्यायला मुभा. तोवर नाही. अंगावरचे आणि पिशवीतून आणलेले सगळे कपडे धुवून दोरीवर टाकल्यावर गुंडाळायला लुगड्याचे धडपे. दोरीवरचे कपडे वाळले की अंगभर कपडे. प्रत्येकाच्या पिशवीत 2-3 कपडे. पायरहाटाने भाचरांच्या अंघोळी आणि नारळी-पोफळीला पाणी पाजऊन मावशीचा मोर्चा पडवीत वळे. इथे नाना वस्तू पडलेल्या. फणसाच्या आठळ्या, विळा, कोयता, लाकडं, खोरं, कुदळ, उखळ, मुसळ अधा वस्तू एकोप्याने नांदत. मोठ्या चुलीवर ढणढणत्या जाळावर पातेल्याला मातीचा लेप लावून आटवल शिजायचे. रोज नाश्ता हाच. आतवल आणि लोणचे. ते ओरपल्यावर आजी सांगे आता जा आंब्याच्या खोलीत. खोलीभर आंब्याची आढी. उबदार दरवळ भरून राहिलेला. हवे तेवढे आंबे खायचे पण बाहेर आणायचे नाहीत. रस पडल्यावर मुंग्या होतील म्हणून. एका टोपलीत गुठळ्या एकात साली टाकायच्या.

      नंतर आगरातून मनसोक्त हुंदडून घरी यायचे ते दुपारच्या जेवणाच्या वेळेला. जेवणाचा बेत म्हणजे फणसाची भाजी, घरच्या चवळीची किंवा मुगाची उसळ, अळूची भाजी आणि भात. भाकरी कधीतरी. आम्ही पण कोकणेच. त्यामुळे आम्हालाही भातावर भागायचे. आईने दिलेलं अर्ध ठिकं पीठ मावशीला मुंबैकर  यईपर्यंत पुरवायचे असल्याने भाकरी बेतास बात. मोठा फणस गड्याकरवी कु-हाडीने तुकडे करुन ठेवल्यावर आजी म्हणे, थोडे गरे भाजीपुरते काढा बाकीचे जाऊदे जाऊदे म्हशीला. पण आमचा जीव भाजीत अडकणार आणि आम्ही सगले गरे काढणार यची तिला पक्की अटकळ असे आणि तसेच व्हायचे. शिजवलेले निम्मे गरे मांडवीवर जात. ही मांडवी म्हणजे एखादा रांगता पोटमाळा. वेताचा किंवा लोखंडाचा. रांधणा-या बाईचा हात पोचेल पण मुलांच्या हाताला लागणार नाही अशा बेताने टांगलेला आणि हवादार. यावर वड्या, लाडू किंवा पुरवून खायच्या वस्तू ठेवल्या जायच्या.

      जेवणानंतर ताईमावशीचा नियम म्हणजे नियम. प्रत्येकाने आपले ताट वाटी, फुलपात्र विहीरीवर जाऊन डोणीतल्या पाण्याने स्वच्छ घासून पालथे घालायचे, मगच झोपायचे. एकच गाय तिच्या दुधावर भागत नसे. उठल्यावर चहा भरपूर पाणी, थोडी साखर आणि चहापत्ती, दूध घालून शिजवलेला. त्याला माझा भाऊ नानू तीर्थ म्हणे. नानूने तक्रार केली की, मावशी म्हणे, ‘तुझ्या बापसास सांग एखादी गाय, म्हैस पाठव म्हणून मग भरपूर दुधाचा चहा देईन’.आईने तक्रार न करता आहे ते आनंदाने खाऊन सुटीचा आनंद लुटा म्हणून सांगितले असले तरी नानूची थोडीफार कुरबुर चालायची. वर्षाला काडेपेटीएचे एक बंडल. तेवढे पुरवून पुरवून वापरायचे. रात्री ओल्या शेणाचा घट्ट गोळा चुलीतल्या निखा-यांवर ठेवला की, त्याची थोडी धुगधुगी असलेला निखारा होई. त्यावर चूल पेटवायची.

चहा झाल्यावर नदीवर जायला निघालो की, आजी बजावायची, खोल पाण्यात जाऊ नका म्हणून. तशी आम्ही सर्व भावंडे जीवाला जपून राहणारी असल्याने तिला काळजी नसे. दिवसभर आमचे करुन दमलेली, भंडावल्याने त्रासलेली मावशी दुस-या आळीतल्या बायकांकडे निघाली की आम्ही पण मागे लागणार. मग आजी म्हणायची, ‘तीस जाऊ दे, बोलू दे तुम्ही नका जाऊत्याबदली मूठ मूठ शेंगा मिळत. गोठ्यात त्या खाताना मावशी आली की आजीला ओरडा बसे. मावशी धूर्तपणे विचारायची, तुम्हाला जेवताना एक एक रव्याचा लाडू चालेल की, फनसाची भाजी हवी? मावशीचा लाडू कधी दगडासारखा तर कधी पार आडवा झालेला. त्यामुळे फणसाचे शिजवलेले गरे मांडवीवरुन खाली येत आणि पुन्हा भाजी, भात, अळूचे फदफदे. रात्री माजघरात ओळीत अंथरुणे पडत. लुगड्यांच्या गोधड्या, पोती, चटई, सतरंजी जे असेल ते. उन्हाला असल्याने काहीही चाले. आम्हाला गाणी म्हणायला लावणारी आजी ती ऐकायची का नाही माहीत नाही. तिला केव्हाच डुलकी लागे. पहाटेच्या वेळी मावशी हुमणाची भीती घाले. घुबडांचा घुत्कार आणि हूमणांचे हूम, हूम. वातावरणात भीती निर्माण करी. त्याच्या भीतीने साखरझोप छान व्हायची.

आम्ही भावंडे आजोळी येऊन तीन चार दिवस होत तोवर आढीतले सगळे आंबे पिकून त्या आंब्यांचा घरभर दरवळ सुटे. मग आजी सांगणार, तुम्हाला साटं घरी न्यायची असतील तर आंबे पिळून ती तयार करा. यात वेळ जाई. साटं करण्याची कला अवगत होई आणि आंबेही सार्थकी लागत. चार-पाच ताटल्या तुपाचे बोट लावून ठेवायच्या. आंबे पिळून त्यावर रस ओतून सारखा करुन त्याला दोन तीन उन्हं दिल्यावर पिळलेल्या आंब्याची ओली साल त्यावर चांगली घासायची आणि रसाचा दुसरा थर द्यायचा. ओल्या सालीमुळे हा दुसरा थर नीट बसे आणि साटं घट्ट होत. कडकडीत उन्हाने कडा सुटलेली साटं उलटून पुन्हा वाळवायची. मागच्या अंगणात मावशी कोकमं वाळवी. बघता बघता सुट्टी संपून जायचा दिवस यायचा. जाताना आजी बरोबर साटं , अननसं, सुपा-या, घारगे असं काहीबाही देई. आजी आणि मावशी दोघींची घारगे बनवण्याची खासियत होती. त्यांच्यासारखे रवाळ घारगे दुस-या कोणाला जमत नसत. भरती ओहोटीच्या हिशेबाने परतीचा प्रवास दुपारी 1-2 वाजता सुरु हो ई. सोबत फणसाच्या भाजीची शिदोरी. दिवेलागणीला आम्ही आमच्या घरी खारेपाटणला. हा क्रम बरीच वर्षे चालला. माझ्या लग्नानंतर खारेपाटण – राजापूर एस. टी चालू झाल्याने होडीचा प्रवास संपला. एरवी आजी-मावशी चैत्रगौर नावाला बसवित. हळदीकुंकू कोन देणार? कोण करणार? त्यामुळे तो घाट घातला जायचा नाही. एके वर्षी मी निलूला (धाकट्या मुलीला) घेऊन गेले होते. गौरीसाठी साग्रसंगीत नैवेद्याचे पान सजले. आगोटीवर साजरा नैवेद्य वाढून शंकराचा  नैवेद्य शिबडात ठेवून आम्ही आडव्या झालो. भूक लागल्यावर निलूने ते पान स्वच्छ करुन ठेवले. पण लेकराने खाल्ले म्हणजे देवाने खाल्लेअशा उदार मताची आजी. पण पुन्हा मोदक आणि इतर कसे करणार? मग कोरड्या शिध्यावर गो ताई, पान देतास?’ म्हणून हाका देणा-या गुरविणीची बोळवण झाली.

मोठा मामा सढळपणामुळे गोत्यात आलेला. त्याची अवस्था बिकट होता. मधला मामा घरातून पळून जाऊन मुंबईला काळबादेवीच्या मंदिरात पुजारी होता. धाकटा मामा वर्षाला पंधरा रुपये पाठवी. तेवढ्यावर या दोघींचा गुजारा. दोन दोन लुगडी आणि पंधरा रुपये दिले की त्याचे कर्तव्य संपले.

 


Comments